धनादेश अनादरप्रकरणी दहा महिने सश्रम कारावास

Foto
 वैजापूर, (प्रतिनिधी) : धनादेश अनादरप्रकरणी एकास दहा महिने सश्रम कारावास व ६५ हजार रुपये नुकसानभरपाई अशी शिक्षा न्यायाधीश एस. के. खान यांनी सुनावली.

वैजापूर येथील जैन व्हेईकल फायनान्सकडून मनोज कचेश्वर यादव (२६, रा. लोढरे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक) यांनी वाहन कर्ज घेतले होते. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे जैन फायनान्सकडून आरोपीकडे रकमेची मागणी केली. तेव्हा आरोपीने फिर्यादी जैन व्हेईकल फायनान्स वैजापूरच्या नावाने २९ ऑगस्ट २०१३ रोजीचा ४५ हजारांचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा बोलठाण, तालुका नांदगावचा धनादेश दिला. धनादेश फिर्यादीने दि वैजापूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक लि., शाखा वैजापूर (ता. वैजापूर) येथे वटविण्यासाठी टाकला. परंतु, पुरेशा रकमेअभावी
आरोपीने दिलेला धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. 

धनादेश न वटता अनादरित होऊन परत आल्यानंतर फिर्यादीने आरोपीस अॅड. मजहर बेग यांच्या मार्फत नोटीस पाठवून अनादरित झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु, आरोपीस नोटीस मिळूनही आरोपीने धनादेशाची रक्कम मुदतीत जमा केली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध २७ नोव्हेंबर २०१३ रोजी वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन अॅड. मजहर करीम बेग यांचेमार्फत फिर्याद दाखल केली होती.

 न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षी पुरावा व वकील बेग यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने आरोपी मनोज यादव यास दहा महिने सश्रम कारावास व फिर्यादीस ६५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची सजा सुनावली. रक्कम न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.